बेळगाव जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला किमान तीन मंत्रीपदे मिळणे गरजेचे आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्हा भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या मोठा असल्याने विस्तारात तीन मंत्रीपदांची आवश्यकता आहे. या संदर्भात हाय कमांड योग्य निर्णय घेईल, तसेच पक्षाची संघटना आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन पात्रांना संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच वेळी जिल्ह्यातील पाऊस आणि पीक नुकसानीबाबत बोलताना मंत्री म्हणाले की, काही भागांत पाऊस झाल्याने ५० टक्के पाण्याची समस्या सुटली आहे. मात्र, काही ठिकाणी पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून, याबाबत सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून योग्य भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

खासगी कंपनीकडून ‘केयुडब्ल्यूएस’ कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, या संदर्भात नुकतीच माहिती मिळाली असून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो तोडगा काढला जाईल. तसेच आरएसएसची बैठक आणि राम मंदिरातील तिजोरी चोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आरएसएसच्या कोणत्याही गोष्टी इतक्या सहजासहजी बाहेर येत नाहीत, सर्व काही गुप्त असते. राम मंदिरातील चोरीच्या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत मंत्री म्हणाले की, हा अत्यंत गंभीर विषय असून याचा तपास सुरू आहे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्यातील मुजराई विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घडामोडी म्हणजे एक धोक्याची घंटा असून, मुजराई मंदिरांचे उत्पन्न केवळ त्याच मंदिरांच्या विकासासाठी वापरले गेले पाहिजे. मंदिराच्या पैशांचा गैरवापर करून कोणालाही मजा करू दिली जाणार नाही, याला कडक लगाम लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments