Belagavi

कामगार कपात आणि थकीत वेतनावरून ‘केयुडब्ल्यूएस’ कर्मचारी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Share

कर्नाटक शहर पाणी पुरवठा व मलनिस्सारण मंडळ विभागातील कर्मचाऱ्यांनी खासगी कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या जुन्या कामगारांना अचानक कामावरून काढले जात असल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. पाच वर्षांपूर्वी हा विभाग एका खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला होता. या कंपनीने १ जुलैपासून ४५ जुन्या कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अचानक बंद केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हजेरी बंद केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

खासगी कंपनीने आतापर्यंत सुमारे ६०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून, मूळच्या ३६० जुन्या कामगारांना टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचा कट रचला आहे, असा थेट आरोप कामगार नेते महेश अनगोळकर यांनी केला आहे. कंपनीने गेल्या महिन्याचे वेतनही रोखून धरल्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत. थकीत वेतन त्वरित अदा करावे आणि नोकरीची सुरक्षा द्यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून, न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात ‘केयुडब्ल्यूएस’चे शेकडो कामगार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: