कौतुंबिक मतभेदांमुळे गेल्या ९ वर्षांपासून वेगळे राहणारे बेळगावमधील एक जोडपे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सर्व वाद विसरून न्यायालयाच्या मध्यस्थीने पुन्हा एकत्र आले आहे. २०१७ पासून न्यायालयात सुरू असलेल्या या वादावर आज परस्पर संमतीने पडदा पडला.


संयुक्त कुटुंबातील किरकोळ वादांमुळे पती चन्नगौडा होसमनी आणि पत्नी आरती होसमनी गेल्या नऊ वर्षांपासून वेगळे राहत होते. बेळगावच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. अखेर न्यायाधीश सुभाष संकद, न्यायाधीश गौरम्मा पाटील, न्यायाधीश गंगाधर के. आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एन. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तडजोडीनंतर या जोडप्याने न्यायालयातच एकमेकांना हार घालून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

या जोडप्याला ७ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नीमधील भांडणाचा मुलांच्या मनावर आणि भविष्यावर वाईट परिणाम होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी जुने मतभेद विसरून एकत्र येण्याचे मान्य केले. या समेट प्रक्रियेत वकील मंजुनाथ एलिबुर्गी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयाबाहेर आल्यानंतर बोलताना पत्नी आरती होसमनी हिने सांगितले की, पती-पत्नीमध्ये काहीही मतभेद असले, तरी दोघांनी एकत्र बसून शांतपणे विचार केल्यास प्रत्येक समस्येवर तोडगा निघतो. कोर्टकचेऱ्या फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही. मुलांच्या भविष्यासाठी आम्ही सर्वकाही विसरून एकत्र आलो आहोत, असा संदेश तिने इतर जोडप्यांना दिला.


Recent Comments