Belagavi

२०२८ मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेस सरकारच सत्तेवर येणार : मुख्यमंत्री

Share

राज्यात २०२८ मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करताना त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीका करत सरकारच्या आगामी योजनांची माहिती दिली.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, सिद्धरामय्या, सतीश जारकीहोळी आणि माझ्या नेतृत्वाखाली २०२८ मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. भाजप सरकारने केवळ भावनांचे राजकारण केले, तर आम्ही जनतेच्या उदरनिर्वाहाचे राजकारण केले आहे. भाजप सरकारने घरोघरी वाटलेल्या अक्षता या अयोध्येहून आलेल्या नसून, आमच्या ‘अन्नभाग्य’ योजनेच्या तांदळाला हळद-कुंकू लावून वाटण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

पक्षातील योगदानाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी स्वतःला मुख्यमंत्री न मानता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो. काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला आहे. कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ६ सदस्यांची गॅरंटी समिती स्थापन केली जात असून, त्यात प्रत्येक समाजाला आणि महिलांना प्रतिनिधित्व दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी दोन-तीन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.

विद्यार्थी चळवळींविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, या वर्षापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्यात येतील. याशिवाय, पाचही गॅरंटी योजना अत्यंत प्रभावीपणे सुरू असून कॅग (CAG) च्या अहवालानुसार गृहलक्ष्मी योजनेत काही त्रुटी आढळल्याने त्याचे पुनरावलोकन सुरू आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत या योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शक्ती योजनेअंतर्गत महिलांना लवकरच स्मार्ट कार्ड दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्यांचे स्वागत करत शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यात येईल, असे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी काँग्रेस मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना मतदार यादी पडताळणी करून पात्र मतदारांचे अर्ज ‘बीएलओ’कडे जमा करण्याचे आवाहन केले. सरकारच्या पाच हमी योजना यशस्वीपणे लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत, त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे व मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.

या सत्कार समारंभाला मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, विश्वास वैद्य, महांतेश कौजलगी, आमदार नागराज यादव, चन्नराज हट्टीहोळी आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

Tags: