खानापूर तालुक्याचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे राबवण्यासंदर्बत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिलेल्या निवेदनात तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील जलसिंचन योजनांसाठी १०० कोटी रुपये, पारीशवाड-अवरोळी योजनेसाठी ५० कोटी रुपये, तसेच जळगा, शेडेगाळी, निलावडे आणि तोरळी या गावांमधील नदी प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. खानापूर हा भाग जंगलाने वेढलेला आणि अतिवृष्टीचा असल्याने, येथील वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भूमिगत केबल टाकण्यात यावी, तसेच बैलूर आणि कणकुंबी येथे नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यात यावीत, अशी मागणी आमदारांनी केली.

तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जांबोटी आणि कुंभारडा या गावांमध्ये तातडीने नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, असा आग्रह आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला. आमदारांच्या या सर्व मागण्यांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी आणि मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज खानापूर


Recent Comments