बागलकोट जिल्ह्यात अरण्य विभागाने मेंढपाळाची शेळी जप्त केल्याने तिच्या ६ पिल्लांचे हाल होत आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ मेंढपाळ आणि शेतकरी संघटनेने बिळगी तहसीलदार कार्यालयासमोर चूल पेटवून अनोखे आंदोलन केले.

बिळगी तालुक्यातील सुनग अरण्य परिसरात चार दिवसांपूर्वी चरण्यासाठी गेलेली एक शेळी अरण्य अधिकाऱ्यांनी नियमभंगाचे कारण सांगत जप्त केली. मात्र, या शेळीची ६ लहान पिल्ले चार दिवसांपासून गोठ्यात भुकेने व्याकुळ झाली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या मेंढपाळांनी आणि शेतकरी नेत्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर गोळा होऊन सरकारविरोधात आक्रोष व्यक्त केला.

आंदोलकांनी शेळीवरील दंड मागे घेण्याची आणि संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. यादरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. गरीब शेतकऱ्याची शेळी तातडीने सोडण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन तीव्र झाले आहे.


Recent Comments