बेळगाव जिल्ह्यात दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या सवलती आणि मानधन वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या आणि मानधन वाढीसाठी या वेळी आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अंतर्गत दिव्यांगांसाठी कायद्यानुसार राखीव असलेला ५ टक्के निधी योग्य पद्धतीने वापरला जात नसल्याची टीका संघटनेचे नेते कृष्णा हितलमनी यांनी केली. आपल्या हक्कासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाणाऱ्या दिव्यांगांना प्रशासनाकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मासिक मानधन न मिळाल्याने अनेक दिव्यांग कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. सध्या मिळणारे ८०० आणि १२०० रुपये मानधन महागाईच्या काळात वैद्यकीय खर्चासाठी अपुरे असल्याने ते किमान २,५०० रुपये करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी प्रताप कांबळे, प्रवीण देवरमणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments