फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेत परदेशी भेटवस्तूंच्या आमिषाने एका व्यक्तीला ७ लाख रुपयांना गंडवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी येथे ही फसवणूक झाली असून ग्रामीण भागातील नागरिक यात बळी पडला आहे.

यरगट्टी तालुक्यातील कुरुबगट्टी गावचे रहिवासी लक्कप्पा सन्निंगनवर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर एका परदेशी महिलेच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्यात संवाद सुरू झाला. आरोपीने प्रेमाचे नाटक करून लक्कप्पा यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर साधारण १.०३ कोटी रुपये मूल्याचे परदेशी चलन आणि महागड्या भेटवस्तूंचे पार्सल पाठवल्याचे भासविले.

यानंतर पार्सल भारतात आले असून ते सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी, मनी लाँड्रिंग प्रमाणपत्र आणि आयकर विभागाचे शुल्क भरायचे असल्याचे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने ७.०५ लाख रुपये उकळण्यात आले. पैसे देऊनही पार्सल न मिळाल्याने संशय आल्यानंतर लक्कप्पा यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी बेळगाव जिल्हा सीआयएन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अशा फसव्या जाळ्यांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Recent Comments