Belagavi

तुरमुरी कचरा डेपोविरोधात टाळ-मृदंगासह ग्रामस्थांचे आंदोलन

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आज तुरमुरी ग्रामस्थांनी टाळ-मृदंग वाजवत अनोखे आंदोलन केले. हा डेपो त्वरित बंद करून स्थलांतरित करावा, अशी मागणी करत हजारो ग्रामस्थांनी बेळगावमध्ये मोर्चा काढला.

गेल्या १० वर्षांपासून शहराचा कचरा गावात येत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. परिसरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. सांडपाणी शेतात शिरल्याने पिके नष्ट होत असून जमिनीतील पाणीही दूषित झाले आहे. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, कचरा डेपोमधील कुत्रे हल्ले करत असून घाण पाण्यामुळे त्वचेचे आजार पसरत आहेत. जनवस्तीत हा डेपो उभारून प्रशासनाने अन्याय केला असून, हा डेपो बंद न झाल्यास लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेणे आवश्यक असून त्यासाठी काही अवधी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत तेथील सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

या आंदोलनात तुरमुरी गावातील महिला, वृद्ध आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला स्थगिती दिल्याने आंदोलकांनी सध्या समाधान व्यक्त केले आहे.

Tags: