आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाचे सावट आणि एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय प्रभावित झाला असून, याचा परिणाम बेळगावमधील कांद्याच्या दरांवर झाला आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरल्याने आवक झालेल्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे.


जागतिक स्तरावरील घडामोडींची झळ आता बेळगावच्या कांदा मार्केटला बसत आहे. शेजारील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ येथून हजारो रुपये खर्च करून कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बेळगावमध्ये अत्यंत कमी दर मिळत आहेत. युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने अनेक हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे मोठ्या आकाराच्या कांद्याला उठाव नसल्याने दरात मोठी घट झाली आहे.

आम्ही सोलापूरहून बेळगाव बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी आणला आहे, मात्र मागणी नसल्याने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद असल्याने भाजीपाल्याची खरेदी मंदावली आहे, ज्यामुळे आमचा वाहतूक खर्च निघणेही कठीण झाले आहे, असे सोलापूर येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
कांद्याला प्रति क्विंटल किमान २५०० रुपये दर मिळाल्यास तो किफायतशीर ठरू शकतो, मात्र सध्याच्या दरामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात घट झाली असून बेळगावमधून होणाऱ्या निर्यातीवरही याचा परिणाम झाला आहे. सध्या बाजारात प्रति क्विंटल ८०० ते १लू०० रुपयांपर्यंत खरेदी केली जात असून हॉटेल व्यवसाय बंद असण्याचा हा थेट परिणाम असल्याची माहिती एका घाऊक व्यापाऱ्याने दिली.
सध्या कांद्याची विक्री ५ ते १५ रुपये प्रति किलो दराने होत आहे. हॉटेल्स बंद असल्याने मोठ्या कांद्याला ग्राहक मिळेनासा झाला आहे. पुणे, कामतेवाडी, पाडगाव, शिरूर या भागांतून कांद्याची आवक होत असली तरी मागणीअभावी दर कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुद्देबिहाळ येथून बेळगावमध्ये कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, एका वाहनाचे भाडे २३०० रुपये झाले असून कांद्याची खरेदी केवळ ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलने होत आहे. पोत्यांचा खर्च आणि मजुरी पाहता शेतकऱ्यांच्या हातात अल्प रक्कम उरत आहे, किमान १५०० रुपये दर मिळणे आवश्यक असल्याचे मुद्देबिहाळच्या शेतकऱ्यांनी नमूद केले.


Recent Comments