Belagavi

राज्योत्सवाच्या निधी गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचे आदेश

Share

बेळगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखालील कन्नड संघटनांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्योत्सवाच्या ५० लाख रुपयांच्या अनुदानाचा गैरवापर झाल्याच्या आरोपावरून, राज्य सरकारने बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना चौकशी करून अहवाल देण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत.

बेळगाव जिल्हा प्रशासनाने कन्नड संघटनांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आणि सरकारी अटींचे उल्लंघन करून कार्यक्रम आयोजित केल्याच्या विरोधात अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखालील १२ संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. सीमा देखरेख मंत्री एच. के. पाटील आणि सरकारच्या मुख्य सचिवांना दिलेल्या तक्रारीनंतर आता सरकारने ही कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत आणि जनतेला योग्य माहिती न देता या निधीचा वापर केल्याबाबत आता सत्य समोर येणे आवश्यक आहे. सरकारच्या या निर्णयाचे बेळगाव जिल्हा कन्नड संघटना क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी स्वागत केले असून, हा कन्नड संघटनांच्या एकजुटीचा विजय असल्याचे अशोक चंदरगी यांनी म्हटले.

जिल्हाधिकाऱ्यांची एकतर्फी भूमिका आणि नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना सरकारने प्रादेशिक आयुक्तांना दिल्या आहेत.

Tags: