बेळगावसह राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पैसे न दिल्याचा निषेध करत भारतीय कृषिक समाजातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. ऊस पुरवठा करूनही महिनाभर बिले रखडल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

नियम सांगतो की ऊस पुरवठा केल्यावर १५ दिवसांत पैसे मिळायला हवेत, पण कारखानदार महिनोंमहिने शेतकऱ्यांचे पैसे दाबत आहेत. हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

साखर कारखान्यांनी सरकारने ठरवलेला दर देणे बंधनकारक आहे. लाखो टन ऊस घेऊनही कारखानदार केवळ अर्धेच पैसे देत आहेत. एकरी ५० हजार रुपये खर्च येतो, पण कारखान्यांकडून वेळेवर पैसे मिळत नाहीत. राज्यातील कारखान्यांकडे ३५०० कोटींची बिले थकीत आहेत. हक्काचे पैसे आणि पिकाला वैज्ञानिक दर न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मुदकण्णा कंकणवाडी यांनी दिला.
शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये अडवून ठेवणाऱ्या कारखानदारांवर सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नाही, ही शरमेची बाब आहे. १२ महिने कष्ट करूनही ४-४ महिने पैसे मिळत नसतील, तर आम्ही जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू, अशी संतप्त प्रतिक्रिया महांतेश कामत यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि भारतीय कृषिक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments