बेळगावमधील रामतीर्थनगरमध्ये श्री कार्यसिद्धी आंजनेय मंदिराचा सातवा वर्धापनोत्सव आणि हनुमान जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. हरिहर येथील जगद्गुरू वचनानंद श्रींच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले .

बेळगावमधील रामतीर्थनगर येथील श्री कार्यसिद्धी आंजनेय मंदिरात गुरुवारी सायंकाळी वर्धापनोत्सवानिमित्त विशेष धार्मिक सभा पार पडली. यावेळी बोलताना विश्व योग गुरु वचनानंद श्री यांनी योगाचे महत्त्व विशद केले. योग हा तणावमुक्त जीवनासाठी तसेच मधुमेह आणि थायरॉईड सारख्या आजारांवर नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी आहे. निरोगी शरीरात निरोगी मन घडवण्याची ही एक जीवनशैली असल्याचे वचनानंद श्री यांनी सांगितले. तर कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांनी मंदिरे ही संस्कृतीची केंद्रे असून प्रार्थनेमुळे मन प्रसन्न होते, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून आर.एस.एस. उत्तर प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाड उपस्थित होते. हनुमान हे शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असून त्यांनी आपल्या शक्तीचा वापर जगाच्या कल्याणासाठी केला, असे मत राघवेंद्र कागवाड यांनी व्यक्त केले. याच दरम्यान मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश उरबिनट्टी यांनी विकासकामांबाबतचे निवेदन महापौरांना सादर केले. वर्धापनोत्सवाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, महारुद्राभिषेक आणि महिलांची भव्य कुंभ मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेत महाप्रसादाचे ग्रहण केले.

व्यासपीठावर महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, निवृत्त जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ, माजी आमदार अनिल बेनके, शंकरगौडा पाटील, मदनकुमार भैरप्पणवर, बसप्पा उरबिनहट्टी, मुरघेंद्रगौडा पाटील, एन.बी. निर्वाणी, डॉ. बसवराज वीरापूर, डॉ. रवी पाटील आणि एम.वी. हिरेमठ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



Recent Comments