Belagavi

मंगसूळी : रिक्षा थांब्यावरील वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसूळी गावात रिक्षा लावण्याच्या रांगेवरून झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयितांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

मंगसूळी येथील रहिवासी अशोक वडर (२७) असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा लावण्याच्या रांगेवरून अशोक आणि इतर काही चालकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. याच वादातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.

याच द्वेषातून आरोपी शिवा वडर, सागर वडर आणि विनोद वडर यांनी अशोकच्या डोक्यात जीवघेणा हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना उशिराने उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

याप्रकरणी कागवाड पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा थांब्यावरील रांगेच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या हत्येमुळे मंगसूळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags: