केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन तीन कामगार संहितांच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये सीआयटीयू संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
बेळगावमध्ये आज निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सीआयटीयू कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले.
सीआयटीयूच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या चार नवीन कामगार संहितांच्या विरोधात देशभरात ‘काळा दिवस’ पाळण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगावमध्येही संघटनेने आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारी आदेशांच्या प्रती जाळून आपला संताप व्यक्त केला.
केंद्र सरकार कामगार कायद्यांमध्ये बदल करून मालकांचे खिसे भरत असून कामगारांच्या पोटावर पाय आणण्याचे काम करत आहे. नवीन संहिता लागू करू नये यासाठी फेब्रुवारीमध्ये ४ कोटी लोकांनी निवेदन देऊनही पंतप्रधानांनी त्यावर विचार न करता नवीन कायदे लागू करण्याचा घाट घातला आहे. या कायद्यांमुळे कामगारांचा वाटाघाटीचा अधिकार, आंदोलनाचा हक्क आणि नोंदणीचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. कामगारांवर होणारा हा हल्ला सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या काळात याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे. एम. जैनेखान यांनी दिला.
या आंदोलनाप्रसंगी सीआयटीयूचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments