भीषण उन्हाळ्याच्या झळा सोसणाऱ्या बेळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे. हिडककल जलाशयातून पिण्याचे पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला असून, ३० मार्चपासून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाई निवारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन ३० मार्च रोजी घटप्रभा नदीत पाणी सोडले जाईल. यामुळे नदीकाठच्या शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे.
नदीपात्रासोबतच ७ एप्रिल रोजी डाव्या आणि उजव्या कालव्यांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून अत्यंत सुसूत्रपणे साठवून ठेवलेले हे पाणी आता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले जाणार आहे. उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी केले आहे.


Recent Comments