बेळगावमधील सी.पी.एड. मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, अनिता कटारिया, आमदार अभय पाटील, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या रॅलीमध्ये जैन धर्माच्या तत्त्वांसोबतच सामाजिक विषयांवर आधारित देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

आपल्या दुचाकीसोबतच बैलगाडीची प्रतिकृती आणून हर्ष गुंडप्पणवर यांनी शेती वाचवण्याचा संदेश दिला. आपण शेती वाचवली नाही, तर भविष्यात पिझ्झा-बर्गरप्रमाणे भाजीपालाही ऑनलाइन ऑर्डर करण्याची वेळ येईल, अशी भीती हर्ष गुंडप्पणवर यांनी व्यक्त केली.

महिलांनी चार भिंतींच्या बाहेर पडून समाजाचे नेतृत्व करावे, असा संदेश ५० युवतींच्या पथकासह आलेल्या एका तरुणीने दिला. ‘जगा आणि जगू द्या’ हा जैन धर्माचा मूळ संदेश या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.

इतिहासातील भरत चक्रवर्ती आणि त्यांच्या वडिलांच्या प्रसंगाची प्रतिकृती सादर करत कृषा पद्मण्णवर यांनी ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. महिलांनी कोणत्याही अडथळ्याविना प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन कृषा पद्मण्णवर यांनी केले.

ही रॅली हिंडलगा गणेश मंदिर, हनुमान नगर सर्कल, क्लब रोड, राणी चन्नम्मा चौक आणि धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे शहापूरमधील महावीर भवन येथे पोहोचून संपन्न झाली.



Recent Comments