राज्यातील अंतर्गत आरक्षणाबाबत न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाचा अहवाल अन्यायकारक असल्याचा आरोप चित्रदुर्ग येथील छलवादी गुरुपीठाचे बसवनागी देव स्वामीजी यांनी केला आहे.
बेळगावमधील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बसवनागी देव स्वामीजी बोलत होते. अंतर्गत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून छलवादी समुदायाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. नागमोहन दास आयोगाच्या अहवालात या समाजाची लोकसंख्या हेतुपुरस्सर कमी दाखवण्यात आली असून, या अहवालाची तातडीने फेरतपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत या अवैज्ञानिक आरक्षणाची अंमलबजावणी करू नये, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून कायदेशीर लढाई लढावी लागेल, असा इशारा बसवनागी देव स्वामीजी यांनी केला. २७ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणावर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते, मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही स्वामीजींनी नमूद केले.
सरकार योग्य निर्णय घेईल अशी आम्हाला आशा आहे, मात्र शब्द फिरवल्यास आगामी काळात सरकारला धडा शिकवू, असा इशारा रवी बस्तवाडकर यांनी दिला. म्हैसूर येथील डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय सहकारी संघाची शाखा आता चिकोडीत सुरू होत असून, यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाला चालना मिळेल. उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती रवी बस्तवाडकर यांनी दिली.
बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर ५ ते ६ लाख समाजबांधवांनी एकत्र येऊन ऐतिहासिक लढा दिला आहे. आमच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही एकजुटीने आवाज उठवू, असे प्रतिपादन दुर्गेश मेत्री यांनी केले.
या पत्रकार परिषदेला एव्हीएसएसचे संस्थापक अध्यक्ष तुंबल रामण्णा, बंजवाडी नारायणप्पा, दुर्गेश मेत्री यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments