Accident

धारवाडमधील ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा छडा

Share

धारवाडमध्ये गेल्या शनिवारी चिक्कमल्लिगावाड जवळ राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला तमिळनाडू नोंदणीचा ट्रक जप्त करण्यात आला असून, त्याच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रमजानच्या दिवशी पाहुण्यांकडे जेवण देऊन दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात लखमापूर गावातील इमामसाब हेब्बळ्ळी (वय २१) याचा जागीच मृत्यू झाला होता, तर महम्मद युनुस मुल्लानावर (वय १७) याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

धारवाड शहर वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास केला. महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण (फुटेज) आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तमिळनाडू नोंदणीकृत ट्रकचा शोध घेतला. या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेचा वेग इतका भीषण होता की, दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

रमजान सणाच्या दिवशीच लखमापूर गावातील दोन तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. धारवाड शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Tags: