बेळगावमधील नियोजित कॅन्सर रुग्णालय दक्षिण मतदारसंघातून उत्तर मतदारसंघात हलवल्याच्या निर्णयावरून आज विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. आमदार अभय पाटील यांनी यावरून सरकारला धारेवर धरले, तर आरोग्य सोयीसाठीच हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले.
विधानसभेच्या अधिवेशनात आमदार अभय पाटील यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. भाजप सरकारच्या काळात वडगावमधील ४०० एकर जागेत हे रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र, आता हे रुग्णालय बिम्स (BIMS) आवारात केवळ १.४ एकर जागेत का हलवले? असा सवाल आमदार अभय पाटील यांनी विचारला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री शरणप्रकाश पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, केवळ ५० कोटींच्या निधीत मोठे रुग्णालय उभारणे शक्य नाही. रुग्णांच्या सोयीसाठी सर्व उपचार एकाच छताखाली मिळावेत म्हणून बिम्सच्या आवारातील जुन्या इमारतीच्या जागी हे रुग्णालय उभारले जात आहे. यात कोणतेही राजकारण नाही, असा खुलासा त्यांनी केला.
यावेळी आमदार अरविंद बेल्लद यांनीही बेळगावात उपचारांसाठी रुग्णांना फिरावे लागते, असा मुद्दा मांडून अभय पाटील यांना साथ दिली. यावर मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले की, बेल्लद हे रुग्णालय हुबळीला नेऊ पाहत होते, मात्र आम्ही ते बेळगावातच ठेवले आहे.
या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. बेळगावच्या आरोग्य सुविधांवरून सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Recent Comments