Belagavi

सत्ताधारी मनपाच्या अपयशामुळेच ‘सिटीस’ योजनेत अडथळे : राजकुमार टोपन्नावर

Share

बेळगाव महानगरपालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या प्रशासकीय अपयशामुळे ‘सिटीस २.०’ योजनेला खीळ बसली असून, आपले अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप राजकुमार टोपन्नावर यांनी केला आहे.

अधिकृत कागदपत्रांचा दाखला देत राजकुमार टोपन्नावर म्हणाले की, स्मार्ट सिटी कंपनीने मे २०२५ मध्येच महापालिकेकडे २० टक्के स्वनिधी मंजुरीसाठी मागणी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये स्मरणपत्रे देऊनही महापालिका प्रशासनाने अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.

महानगरपालिकेने आपला २० टक्के हिस्सा अद्याप जमा केलेला नाही, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागाही निश्चित केलेली नाही. जोपर्यंत आर्थिक तरतूद आणि जागेचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटीचा संपूर्ण आराखडा सादर करणे शक्य नाही, असे टोपन्नावर यांनी स्पष्ट केले.

सत्य स्वीकारण्याऐवजी भाजप सत्ताधारी आता स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर दोषारोप करत आहेत. विधानसभेत एल अँड टी कंपनीला लक्ष्य करणे, हा केवळ दक्षिण मतदारसंघातील जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका राजकुमार टोपन्नावर यांनी केली.

महापालिकेने तातडीने २० टक्के निधी जमा करून जागेचा प्रश्न मार्गी लावावा आणि स्मार्ट सिटी प्रशासनासोबत समन्वय साधून हा प्रकल्प विनाविलंब सुरू करावा. बेळगावच्या जनतेला दिशाभूल करणारे राजकारण नको, तर विकास हवा आहे, असे राजकुमार टोपन्नावर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Tags: