कोल्हापूर जवळील कण्हेरी येथे ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी हस्तकला महाकुंभ’ रंगणार असून १७ राज्यांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार यात सहभागी होणार आहेत. दुर्मिळ हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या या भव्य मेळाव्याची माहिती वर्षा पाटील यांनी दिली.
कोल्हापूरच्या कण्हेरी मठात ३१ मार्चपासून देशातील दुर्मिळ हस्तकलांचे दर्शन घडवणारा ‘सिद्धगिरी हस्तकला महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा पाटील यांनी दिली. बेळगाव मधील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सिद्धगिरी संस्थान मठ कण्हेरी आणि महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होत असल्याचे वर्षा पाटील यांनी बेळगावमध्ये सांगितले. या महाकुंभात १७ राज्यांमधील २०० हून अधिक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार विजेते कलाकार सहभागी होत असून, पारंपारिक कलांना आजच्या काळातील बाजारपेठ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे वर्षा पाटील यांनी नमूद केले. ३१ मार्च ते ४ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन चालणार आहे. यामध्ये टेराकोटा, मातीचे दागिने, बांबूकाम, पिंगुळी चित्रकला, बनारसी जरदोजी साड्या यांसह शेकडो कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री होणार असल्याचे वर्षा पाटील यांनी सांगितले.
यावेळी विवेक सिद्ध यांनी प्रास्ताविक करताना तांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले. तरुण पिढीने या कलांची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून लघु उद्योग सुरू करण्यासाठी ही उत्तम संधी आहे, अशी माहिती विवेक सिद्ध यांनी दिली. या उपक्रमात एकरवन इना कंपनीचाही सहभाग आहे. भारतातील पारंपारिक कला आणि कलाकारांचा सन्मान करणाऱ्या या महाकुंभाला नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या पत्रकार परिषदेला सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, विवेक, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवेकर आणि रामचंद्र कट्टी उपस्थित होते.


Recent Comments