बेळगावमधील २१ शेतकरी उत्पादक संस्थांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने १.८० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या विशेष योजनेतून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याची माहिती खासदार ईरण्णा कडाडी यांनी दिली.
संसदेत ईरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले. जिल्ह्यातील १७ संस्थांना १.८० कोटींचे अनुदान आणि ४ संस्थांना ३४.४८ लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. या संस्था सध्या धान्य, कडधान्ये आणि ऊस प्रक्रिया उद्योगात सक्रिय आहेत. शेतकऱ्यांना स्वतः दर ठरवता यावा यासाठी १० कंपन्या ‘ई-नाम’ पोर्टलशी जोडल्या आहेत. त्यांना ऑनलाइन व्यापाराचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामुळे मध्यस्थांशिवाय माल थेट बाजारपेठेत पोहोचणार असल्याचे रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले.
शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्यास आणि मध्यस्थांशिवाय थेट व्यापार केल्यास त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वास ईरण्णा कडाडी यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन ईरण्णा कडाडी यांनी केले आहे.


Recent Comments