Belagavi

बेळगाव पोलिसांनी शोधले चोरीला गेलेले ५१ मोबाईल

Share

बेळगाव जिल्हा पोलिसांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीला गेलेले ५१ मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी आज स्वतः मोबाईल मालकांना त्यांचे संच सुपूर्द केले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये चोरीला गेलेले आणि हरवलेले ५१ मोबाईल सायबर क्राईम पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत केले आहेत. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी सांगितले की हस्तगत केलेल्या संचांमध्ये की-पॅड फोनसह महागड्या स्मार्टफोनचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झालेल्या ४७४४ तक्रारींपैकी १०५१ मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

अथणी, रामदुर्ग, बैलहोंगल भागातील जत्रा आणि बसस्थानकांवर मोबाईल हरवलेल्या नागरिकांनी केंद्र सरकारच्या सीईआयआर पोर्टलवर तक्रारी नोंदवल्या होत्या. या मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकताच सायबर पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि तातडीने संबंधित क्रमांकांवर संपर्क साधून मोबाईल जप्त करण्यात आले. नागरिकांनी मोबाईल हरवल्यास त्वरित तक्रार नोंदवून या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन के रामराजन यांनी यावेळी केले.

Tags: