Belagavi

बेळगावमध्ये पाण्याच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड तालुक्यातील नुग्गानट्टी गावात शेतातील पाणी सोडण्याच्या वादातून मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली आहे.

मुरगोड तालुक्यातील नुग्गानट्टी गावात जमिनीच्या पाणी वाटपाच्या कारणावरून दोन भावांमध्ये जोरदार भांडण झाले. यल्लाप्पा देमप्पा सण्णम्मनावर असे या घटनेत मृत्यू झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी पाण्याच्या कारणावरून यल्लाप्पा आणि त्यांचा मोठा भाऊ ५५ वर्षीय महादेवप्पा सण्णम्मनावर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली होती. हा वाद विकोपाला गेल्याने महादेवप्पा याने आपल्या धाकट्या भावावर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या यल्लाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पतीच्या मृत्यूप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. सध्या हत्या करणाऱ्या महादेवप्पा या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. केवळ क्षुल्लक कारणावरून झालेल्या या खुनाच्या प्रकरणामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Tags: