Belagavi

बेळगाव जिल्हा पंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकवणे हेच आमचे ध्येय : चन्नराज हट्टीहोळी

Share

बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस प्रचार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री विनयकुमार सोरके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी स्पष्ट केले की, केवळ पाच गॅरंटी योजनांच्या जोरावर निवडणुका जिंकणे शक्य नाही. यासाठी युवा पिढीला विश्वासात घेणे आवश्यक असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क वाढवला पाहिजे. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला जनसामान्यांच्या समस्यांबाबत जाब विचारण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष हिंदू आणि मुस्लिम अशा सर्वांच्या हिताचा असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. पक्ष हे एका कुटुंबासारखे असून घरातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.

राज्यात सर्वाधिक १०० सदस्य असलेल्या बेळगाव जिल्हा पंचायतीवर काँग्रेसची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट सर्वांनी समोर ठेवले पाहिजे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून भाजपच्या आव्हानाचा सक्षमपणे सामना करण्याची ताकद बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केला.

प्रचार समितीचे उपाध्यक्ष सुरेंद्र व्ही. यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. या कार्यक्रमाला बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, ग्रामीण जिल्हा प्रचार समिती अध्यक्ष राजा सलीम काशम्मनवर आणि शहर जिल्हा प्रचार समिती अध्यक्ष गजू धरणायक उपस्थित होते.

Tags: