“महिलांना समाजात समान संधी मिळायला हवी आणि त्यांचा आवाज अधिक बुलंद झाला पाहिजे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हाच पाया आहे,” असे मत युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी व्यक्त केले.


बेळगाव येथील कुमार गंधर्व कला मंदिरात ‘कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती’ आंबेडकर ध्वनी, चंद्रकांत काद्रोळी गटाच्या वतीने आयोजित ‘महिला जागृती मेळाव्या’त ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. श्री बसवमूर्ती स्वामीजी आणि श्री ब्रह्मानंद अजन्नवर यांच्या सान्निध्यात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या कार्याध्यक्षा बाळव्वा हरिजन होत्या.

यावेळी मार्गदर्शन करताना स्वामीजींनी सांगितले की, कुटुंबाचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्तर उंचावण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला सुशिक्षित झाल्या तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते.
राहुल जारकीहोळी पुढे म्हणाले की, “ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेल्या समान हक्कांमुळेच आज भारतातील महिला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहेत. समाजात सन्मानाने जगण्यासाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र आहे.”
या मेळाव्यास आशा ऐहोळे, एच. कोत्रेम्मा, सुनीता ऐहोळे, कमलव्वा करमन्नवर, लक्ष्मी नागन्नवर, माला तुरीहाळ, पार्वती आडूर, शरणम्मा पुजारी, सुनीता मोदगी, विरुपमा दोडमणी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments