Belagavi

बेळगाव: रयत गल्लीतील पाणीटंचाईच्या निषेधार्थ रहिवाशांचे आंदोलन

Share

वडगावमधील रयत गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी सकाळी रिकाम्या घागरी घेऊन रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला.

रहिवाशांच्या तक्रारीनुसार, नळावाटे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असून हे पाणी वापरासाठी अत्यंत अयोग्य आहे. या समस्येबाबत गेल्या २० दिवसांपासून महानगरपालिकेकडे वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

या गल्लीतील एकमेव बोरवेल सध्या पूर्णपणे नादुरुस्त असून परिसरातील विहिरीतही दूषित पाणी मिसळत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. इतर भागांत पाण्याची सोय असताना केवळ रयत गल्लीकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Tags: