Belagavi

थकीत बिलासाठी ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर

Share

बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी थकीत बिलासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चूनप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढला.

बेळगावमधील साखर आयुक्त कार्यालयाचा परिसर आज शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला. प्रति टन ३,३०० रुपये दर निश्चित होऊनही कारखानदार पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप चूनप्पा पुजारी यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांचा हिशोब मागितला. प्रशासकीय माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांपैकी केवळ २ कारखान्यांनी १०० टक्के देयके अदा केली असून उर्वरित २७ कारखान्यांकडे १५५४ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कारखानदार हेतुपुरस्सर शेतकऱ्यांचे पैसे थकवत असून सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी चूनप्पा पुजारी यांनी केली. थकबाकी न देणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. अनेक बड्या नेत्यांचे हे कारखाने असून यामुळे लाखो शेतकरी अडचणीत आले आहेत. ऊस पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असतानाही नियम धाब्यावर बसवले जात आहेत, असे चूनप्पा पुजारी यांनी म्हटले.

बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आता वसुलीच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. ऊस देऊन तीन महिने उलटले तरी पैसे हाती आले नाहीत, मग १८ महिन्यांचे व्याज कसे भरायचे? असा सवाल एका आंदोलक शेतकऱ्याने उपस्थित केला. थकीत बिलांबाबत प्रशासनाने काय कारवाई केली, याचे उत्तरही शेतकऱ्यांनी मागितले.

शेतकऱ्यांच्या या उग्र आंदोलनामुळे साखर आयुक्त कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जर वेळेत बिले मिळाली नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Tags: