बेळगावमधील मुतगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध उपनगरांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीच्या या दिरंगाईविरोधात सदस्यांनीच आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुतगा ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम नगर, साई नगर, गोकुळ नगर, विनायक नगर आणि बसव नगरमधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून नागरी समस्यांनी त्रस्त आहेत. याविषयी माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य रवी कोटबाग यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. वारंवार विनंती करूनही पंचायतीचे प्रशासन नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्याभरापासून ठप्प असून कचरा उठाव करणारी वाहनेही येत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा निष्काळजीपणा असाच सुरू राहिल्यास ग्रामस्थांसह उग्र आंदोलन करण्याचा इशारा रवी कोटबाग यांनी दिला आहे.
या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून रवी कोटबाग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी पी. बी. दुडगुंडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी तत्काळ स्थानिक पीडीओ आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावून घेत फैलावर घेतले. पुढील आठवडाभरात पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पी. बी. दुडगुंडी यांनी दिले आहे. आता या आश्वासनाची पूर्तता होते की ग्रामस्थांना पुन्हा संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments