Belagavi

मध्यपूर्वेतील युद्धाचा बेळगावच्या एपीएमसीला मोठा फटका

Share

मध्यपूर्वेतील युद्धाच्या संकटामुळे बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे व्यवहार ५० टक्क्यांनी कोसळले आहेत. इंधन दरवाढ आणि परराज्यांतील हॉटेल्स बंद झाल्याने भाजीपाल्याची मागणी घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

कर्नाटकातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बेळगाव एपीएमसीमध्ये युद्धाचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे. गोवा, महाराष्ट्र आणि मंगळुरू भागात दररोज होणारा भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्या भागातील हॉटेल्स आणि कॅन्टीन बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी उरलेली नाही. तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

या आर्थिक संकटामुळे बेळगाव एपीएमसीमध्ये होणारी दररोजची सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल आता केवळ १ कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही. विकला न गेलेला भाजीपाला सडून खराब होत असल्याने शेतकऱ्यांना आपला भांडवली खर्चही निघणे कठीण झाले आहे.

या गंभीर परिस्थितीवर एपीएमसी भाजीपाला घाऊक व्यापारी संघाचे संचालक सतीश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली दरवाढ आणि पुरवठ्यातील अडथळे याचा थेट फटका गरीब शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या खिशाला बसत असल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले. सरकारने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: