Belagavi

पुणे-बेंगळुरू महामार्गाचे सहापदरीकरण अंतिम टप्प्यात

Share

बेळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४८ च्या सहापदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून प्रवाशांना लवकरच सुसाट प्रवासाची संधी मिळणार आहे. राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

बेळगाव ते संकेश्वर बायपासपर्यंतच्या ४० किलोमीटर रस्त्याचे ९८ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून ३१ मार्च २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे खुला होईल. तर संकेश्वर ते महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या ३७ किलोमीटर कामाची ७८ टक्के प्रगती झाली असून हे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. बेळगाव ते धारवाड या ७९ किलोमीटर मार्गाचे काम आधीच १०० टक्के पूर्ण झाले आहे.

महामार्ग विस्तारासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. हिरेबागेवाडी, हत्तरगी आणि कोगनोळी टोल प्लाझावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हायब्रीड इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा बसवण्यात येत आहे. कित्तूर आणि संकेश्वर येथे भुयारी मार्गांचे काम पूर्ण झाल्याने स्थानिक वाहतुकीलाही मोठी मदत होणार आहे.

Tags: