स्त्रीशिक्षण, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा आहे. असे प्रतिपादन माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ समाजसेवक अनिल पाटील यांनी केले.

विश्वभारत जनकल्याण सामाजिक संस्था, रत्नअर्जुन फाउंडेशन पुणे, जे के फाउंडेशन, दिपज्योती फाउंडेशन आणि इतर विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर संभाजी चौक येथील श्री शंभू जत्तीमठ येथे रविवारी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून आणि प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये समाजसेविका निर्मला वीरभद्र उचगावकर, माधुरी नेवगिरी, सुमती पुजारी, वर्षा चौगुले, विद्या गिरी, साधना पाटील, साधना मेलगे, प्रियंका जेलुगडेकर आणि लक्ष्मी धामणेकर यांचा समावेश होता.
अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सावित्रीबाई फुले यांनी सोसलेल्या कष्टांमुळेच आज महिलांना स्वाभिमानाचे आयुष्य जगता येत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
व्यासपीठावर शिवाजी मेलगे, प्रतीक धामणेकर, श्रीधर पाटील, एस एस पाटील, प्राध्यापक विशाल करंबळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक मयुर नागेनहट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्राध्यापक शशिकांत धामणेकर यांनी प्रास्ताविक मांडले. प्राध्यापक निलेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि अनिल गिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला बेळगावमधील महिला, युवक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments