कर्नाटक राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि दिशा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत, नशामुक्त कर्नाटक आणि नशामुक्त बेळगाव अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.


बेळगावच्या जिल्हा क्रीडा संकुलात श्री पूर्णानंद महास्वामींच्या दिव्य सान्निध्यात या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भगवान बी.सी., डॉ. अशोक शेट्टी, डॉ. सोनवलकर, श्याम घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली. यानंतर नशामुक्त भारतासाठी उपस्थितांनी शपथ घेतली.

सुमारे ५५ हजार लोकांच्या सहभागामुळे या अभियानाला यश मिळत असून, जनतेने जागरूक राहिल्यास ड्रग्जचा नायनाट करणे शक्य आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अमली पदार्थांवर प्रभावी नियंत्रण मिळवले असून, प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासूनच या जनजागृतीची सुरुवात करावी, असे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी केले.

नशेचा मार्ग आयुष्याचा अपमान करणारा असून हा अंधकार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. पोलिसांनी ७०० किलो गांजा जप्त करून मोठी कारवाई केली असून, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्यात शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

निरोगी राष्ट्र उभारणीत ड्रग्जचे संकट मोठा अडथळा ठरत असून तरुण पिढीला या विळख्यातून वाचवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने देशात पहिल्यांदाच असे मोठे जनजागृती अभियान राबवले असून यात प्रत्येक विद्यार्थ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे डॉ. भगवान बी.सी. यांनी म्हटले.

जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेली ही रॅली नेहरू नगर, कोल्हापूर सर्कल, डॉ. आंबेडकर रोड आणि राणी चन्नम्मा चौकमार्गे सरदार मैदानावर पोहोचली. या महारॅलीमध्ये हजारो विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.


Recent Comments