भारतात गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी आणि गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी बेळगावातून एका राष्ट्रव्यापी अभियानाला सुरुवात झाली आहे.


गणपत गल्लीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात विशेष पूजा आणि प्रार्थना करून गोभक्तांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. संपूर्ण भारतातून गोहत्या मोडीत काढण्यासाठी आणि गोचर जमिनींचे संरक्षण करण्यासाठी हे देशव्यापी अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज बेळगावच्या गणपत गल्लीतील गणपती मंदिरात प्रार्थना पत्र देवाच्या चरणी अर्पण करून विशेष आशीर्वाद घेण्यात आले. २७ एप्रिल २०२७ रोजी भारतातील सुमारे साडेपाच हजार तालुक्यांमधून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर करण्याचे नियोजन असून, या कार्यात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी विघ्नहर्त्याला साकडे घालण्यात आले.
या अभियानाच्या रूपरेषेबद्दल बोलताना “२७ एप्रिल रोजी बेळगावात शांततापूर्ण मिरवणूक काढली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला मागणीचे निवेदन दिले जाईल,” अशी माहिती गोरक्षक निलेश यांनी दिली. हे अभियान प्रत्येक सनातनी धर्माभिमानी व्यक्तीचे कर्तव्य असून गोहत्या बंदी आणि गोवंशाच्या रक्षणासाठी सर्वांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे, असे आवाहन निलेश यांनी केले.
गोमातेच्या सन्मानासाठी सुरू झालेले हे ‘गो सन्मान अभियान’ आता एका मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


Recent Comments