Belagavi

बेळगावात मोठा जमीन घोटाळा; उपनिबंधकांवर फौजदारी कारवाईची मागणी

Share

बनावट कागदपत्रांच्या आधारे ब्राह्मण समाजाच्या वडिलोपार्जित जमिनी हडपल्याचा खळबळजनक आरोप बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टने केला आहे. या जमीन घोटाळ्यातील भूमाफिया आणि त्यांना साथ देणाऱ्या उपनिबंधकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे आणि उपाध्यक्ष भरत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या सर्व नोंदणी प्रकरणांची चौकशी करून पीडित कुटुंबांना त्यांचे हक्क परत मिळवून द्यावेत आणि त्यांना पोलीस संरक्षण पुरवावे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

बेळगाव शहर आणि खानापूरसह ग्रामीण भागात संघटित टोळ्यांनी मृत व्यक्तींना कागदोपत्री जिवंत दाखवून आणि बनावट हक्कपत्रे तयार करून जमिनींचे हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. उपनिबंधक कार्यालयात कागदपत्रांची योग्य पडताळणी न करताच ही नोंदणी केली जात असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अशा प्रकारे बनावट कागदपत्रांवर जमिनीची नोंदणी होणे अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्यच नाही, असे भरत देशपांडे यांनी म्हटले आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा घोटाळा झाला असून संबंधितांवर क्रिमिनल केस दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

निवेदन सादर करताना खजिनदार रमेश कुलकर्णी, संयुक्त सचिव विलास जोशी, अनुश्री देशपांडे, बी.आर. पाटील, जी.डी. जोशी, अशोक देशपांडे यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: