Belagavi

बेळगाव डीसीसी बँक युद्ध; कत्ती-सवदींच्या बालेकिल्ल्यात भालचंद्र जारकीहोळींची एन्ट्री

Share

बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या डीसीसी बँकेचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. रमेश कत्ती आणि लक्ष्मण सवदी यांचे वर्चस्व असलेल्या रामदुर्ग मतदारसंघात आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी थेट एन्ट्री केल्याने येथील विद्यमान आणि माजी आमदारांचे धाबे दणाणले आहेत.

बेळगाव जिल्हा राजकारणातील डीसीसी बँकेची सुंदोपसुंदी आता रामदुर्गपर्यंत पोहोचली आहे. हुक्केरी आणि अथणीनंतर भालचंद्र जारकीहोळी आणि बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या पथकाने रामदुर्गमध्ये तळ ठोकला आहे. येथील कृषी पत्तीन सहकारी संस्थांच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक घेऊन भालचंद्र जारकीहोळी यांनी स्थानिक नेत्यांना थेट आव्हान दिले. “आमच्या एन्ट्रीमुळे आजपासून त्यांची झोप उडणार असून खऱ्या अर्थाने टेन्शन आता सुरू झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.

यापूर्वीच्या डीसीसी बँक निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक पट्टण आणि भाजपचे माजी आमदार महादेवप्पा यादवाड यांनी एकत्र येत जारकीहोळी समर्थित उमेदवाराचा पराभव केला होता. लक्ष्मण सवदी आणि रमेश कत्ती गटाशी जवळीक असलेल्या या नेत्यांच्या विरोधात आता भालचंद्र जारकीहोळी गटाने नवी रणनीती आखली आहे. “आम्ही बाहेरचे नसून तुमचेच आहोत; शेतकरी आणि विणकरांच्या हितासाठी आम्ही काम करू,” असे आश्वासन देत भालचंद्र जारकीहोळी यांनी रामदुर्गमधील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत दिले आहेत.

Tags: