बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी डीसीसी बँकेच्या भूमिकेवरून विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. डीसीसी बँक ही मुळात शेतकऱ्यांच्या हितासाठी बनली असून, केवळ नफ्याचा विचार करून शेतकऱ्यांचे कर्ज नाकारता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा जारकीहोळी यांनी घेतला आहे.

बेळगावात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सतीश जारकीहोळी यांनी बँक प्रशासनाला स्पष्ट संकेत दिले. केवळ शेतकऱ्यांना कर्ज दिल्यास बँकेची प्रगती होणार नाही, या अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत जारकीहोळी म्हणाले की, बँकेला नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. नाबार्ड आणि आरबीआयच्या नियमावलीनुसार कर्ज मर्यादा वाढवण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

राजकीय प्रश्नांवर बोलताना चन्नराज हट्टीहोळी यांच्या विधानावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले, मात्र आगामी जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुका ग्रामपंचायतीनंतरच होतील असे त्यांनी निश्चित केले. याशिवाय आगामी अर्थसंकल्पात बेळगाव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी करणार असून हिडकल जलाशयात वृंदावनच्या धर्तीवर उद्यान उभारण्याचा आणि गोकाक पर्यटन क्षेत्राचा कायापालट करण्याचा मानस सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.


Recent Comments