केंद्र सरकारच्या नव्या जाचक नियमांमुळे बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पेन्शनधारकांच्या हक्कावर गदा आणणारे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज बेळगावात ऑल इंडिया बीएसएनएल कर्मचारी संघटनेने भव्य निदर्शने केली.

आज बेळगावात ऑल इंडिया बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रामू तटपटी यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. पेन्शनधारकांसाठी जाचक ठरणारे कायदे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि पेन्शन नूतनीकरणाची रखडलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी रामू तटपटी यांनी केली.

आंदोलनात सहभागी झालेले सचिव जी. ए. दळवाई यांनी सरकारच्या नव्या ‘व्हॅलिडेशन’ कायद्याचा तीव्र निषेध केला. हा कायदा पेन्शनधारकांच्या मुळावर उठणारा असून निवृत्त कर्मचारी सरकारवर ओझे नाहीत, त्यामुळे आम्हाला ८ व्या वेतन आयोगाचे लाभ मिळायलाच हवेत, असे जी. ए. दळवाई यांनी म्हटले.
देशभरात निवृत्त कर्मचाऱ्यांचा लढा तीव्र होत असून सरकारने घाईघाईने लागू केलेले नवे कायदे रद्द करावेत आणि ५ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी बेळगावातील बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments