Belagavi

कोट्यवधी खर्चूनही बेळगावचा ‘अंडरपास’ धूळ खात

Share

बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला भुयारी मार्ग सध्या बिनकामाचा ठरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आणि जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना आज समाजसेविका कस्तुरी भांवी यांनी चांगलेच धारेवर धरले.

मध्यवर्ती बस स्थानक ते सीबीटी दरम्यानच्या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा अंडरपास बांधण्यात आला आहे. मात्र, त्याचा वापर करण्याऐवजी नागरिक धोकादायक पद्धतीने रस्ता दुभाजकावरून उड्या मारून रस्ता ओलांडत आहेत. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश असून, भरधाव वाहनांच्या गर्दीत रस्ता ओलांडणे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. ही प्रशासनाची हलगर्जी आहे की जनतेची उदासीनता, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

नागरिकांची ही धोकादायक प्रवृत्ती पाहून कस्तुरी भांवी यांनी आज थेट रस्त्यावर उतरून जनजागृती केली. दुभाजकावरून उडी मारणाऱ्या प्रवाशांना त्यांनी रोखले आणि अंडरपास वापरण्याचे आवाहन केले. “अशा प्रकारे रस्ता ओलांडताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? जीव गेल्यानंतर पश्चात्ताप करून उपयोग नाही,” अशा शब्दांत त्यांनी प्रवाशांना सुनावले. प्रशासनाने तातडीने या अंडरपासमधील अडथळे दूर करून तो लोकांच्या वापरासाठी सोयीचा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Tags: