Belagavi

संजीवनी फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात

Share

बेळगावमधील संजीवनी फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

‘संजीवनी काळजी केंद्र’ हे केवळ एक केंद्र नसून ते एक परिपूर्ण कुटुंब आहे. गेल्या पाच वर्षांची या संस्थेची वाटचाल प्रेरणादायी असून, येथील कर्मचारी जीव ओतून रुग्णांची सेवा करत आहेत, अशा शब्दांत उगार साखर कारखान्याच्या स्मिता शिरगावकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

संजीवनी फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे जयभारत फाउंडेशनचे व्यवस्थापक बसनगौडा पाटील यांनीही संस्थेच्या ध्येयवादाचे कौतुक केले. एखादी संस्था सुरू करणे सोपे असते, मात्र ती सातत्याने समाजहितासाठी चालवणे आव्हानात्मक असते. ही जोखीम पत्करून संजीवनीची टीम उत्तम काम करत आहे, अशी प्रतिक्रिया बसनगौडा पाटील यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात पाच वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केंद्रातील वृद्ध आणि मनोरुग्ण विभागातील सदस्यांनी सादर केलेली नृत्ये ठरली, ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन मदन बामणे यांनी स्नेहसंमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. येत्या दोन वर्षांत दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्थेच्या स्वतःच्या वास्तूत २०० खाटांपर्यंत सेवा विस्तारण्याचा संकल्प मदन बामणे यांनी बोलून दाखवला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हितचिंतक आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: