Belagavi

मलप्रभा नदी पात्रातील भग्न मूर्तींचे संकलन; सर्व लोकसेवा फाउंडेशनचे जनजागृती अभियान

Share

नदी पात्रात देव-देवतांच्या प्रतिमा आणि भग्न मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी बेळगावातील सर्व लोकसेवा फाउंडेशनने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. खानापूर जवळील मलप्रभा नदीच्या काठावर विखुरलेल्या शेकडो प्रतिमांचे विधिवत संकलन करून संस्थेने जनजागृतीचा संदेश दिला आहे.

खानापूर जवळील मलप्रभा नदी पात्रात बेवारसपणे पडलेल्या हिंदू देव-देवतांच्या शेकडो भग्न मूर्ती आणि प्रतिमांचे संकलन करण्यासाठी सर्व लोकसेवा फाउंडेशनने विशेष अभियान राबवले. सार्वजनिक ठिकाणी किंवा नदीकाठी अशा प्रकारे प्रतिमा टाकल्याने देवतांची विटंबना होत असल्याचे लक्षात येताच, फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली रविवारी या सर्व प्रतिमा सन्मानपूर्वक एकत्रित करण्यात आल्या.

या मोहिमेत खानापूर तालुका संचालक डॉ. आय. डी. हिरेमठ, राजाराम मादर, सिद्धू नरवाडे आणि इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संकलित केलेल्या या शेकडो प्रतिमा फाउंडेशनने आपल्या ताब्यात घेतल्या असून, लवकरच त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जाईल, असे वीरेश हिरेमठ यांनी सांगितले. देवांच्या प्रतिमा कुठेही फेकून त्यांचा अपमान करू नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Tags: