गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधा आणि हक्कपत्रापासून वंचित असलेल्या कुटुंबांच्या न्याय्य हक्कासाठी करुनाड रक्षण वेदिकेने रणशिंग फुकले आहे. खानापूर येथील बंगीबोळा कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज जिल्हा पंचायत कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली.

खानापूर तालुक्यातील गांधीनगर येथील तिसऱ्या क्रॉसमध्ये सुमारे ५० वर्षांपासून राहणाऱ्या बंगीबोळा कुटुंबाला सरकारच्या किमान सुविधाही मिळत नसल्याचे समोर आले आहे. या अन्यायाविरुद्ध करुनाड रक्षण वेदिकेच्या उत्तर कर्नाटक घटकाने आज बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. सरकारी जागेत राहणाऱ्या इतर सर्वांना सुविधा मिळत असताना, केवळ तीन कुटुंबांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे कुरुनाड रक्षण वेदिकेचे उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष मंजुनाथ झल्ली म्हणाले की, “हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील या कुटुंबांना तातडीने घराचा उतारा आणि वीज जोडणी देण्यात यावी. गरीब कुटुंबांना न्याय देण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित पीडीओला तत्काळ बडतर्फ करावे. अन्यथा, आगामी काळात बेमुदत आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनानंतर जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी मल्लिकार्जुन मरकुंबी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments