Belagavi

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य

Share

बेळगावच्या महांतेश नगर रहिवासी संघाचे शिक्षण महाविद्यालय, आवास फायनान्शिअर लिमिटेड आणि त्रिगुणा – सायन्स ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ते सुरक्षा बुटकॅम्प २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

वाहन चालवताना व्यक्तीने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचे आहे. वाहन चालकावर केवळ स्वतःचीच नाही, तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. अनेकदा बेजबाबदारपणामुळे भीषण अपघात घडतात, असे मत बेळगाव ट्रॅफिकचे एसीपी जे. निकम यांनी व्यक्त केले.

हेल्मेटशिवाय वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे आणि मद्यपान करून गाडी चालवणे ही रस्ते अपघातांची मुख्य कारणे आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंड वसूल केला जाईल, असा इशारा दक्षिण वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महांतेश मिर्जी यांनी दिला. तसेच त्यांनी ट्रॅफिक मॅनेजमेंट कमिटीच्या कामकाजाची माहिती दिली.

आजची तरुण पिढी वाहतूक नियमांचे पालन न करता आपला जीव धोक्यात घालत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी चिंता महांतेश नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गुरव यांनी व्यक्त केली.

यावेळी महांतेश नगर रहिवासी संघाच्या शिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी रस्ते सुरक्षेवर आधारित एका लघुनाटिकेचे सादरीकरण केले.

या उपक्रमांतर्गत एमएनआरए, सीटीई, सागर आणि केएसआर शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनींना २५० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला महांतेश नगर रहिवासी संघाचे मानद सचिव संजीत पट्टणशेट्टी, प्राचार्य डॉ. निर्मला बट्टल, आवास फायनान्शिअर्सचे राज्य प्रमुख शशिधर, अनुष्का दास, अतुल कृष्ण, दीपक, मारुती, मल्लिकार्जुन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रियांका अनगोळकर हिच्या प्रार्थनेने झाली. प्राचार्य डॉ. निर्मला बट्टल यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले, तर प्रा. रूपा अक्की आणि प्रा. तहसीन शिरगुप्पी यांनी सूत्रसंचालन केले.

Tags: