स्मार्ट सिटी बेळगावला कचरामुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेला हायटेक ‘अंडरग्राउंड बिन’ प्रकल्प महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आमदार अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेली ही व्यवस्था सध्या कचऱ्यात गेली असून, नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकावा लागत असल्याने परिसरात नरकयातना सोसाव्या लागत आहेत.

बेळगावच्या राणी चन्नम्मा नगरमधील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी अत्याधुनिक ‘अंडरग्राउंड बिन’ (जमिनीखालील कचरा कुंड्या) बसवण्यात आल्या होत्या. रस्त्यावर कचरा दिसू नये आणि परिसर स्वच्छ राहावा या उद्देशाने आमदार अभय पाटील यांनी हा प्रकल्प राबवला होता. मात्र, या व्यवस्थेची देखभाल करणाऱ्या महानगरपालिकेने या कुंड्यांच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही हायटेक यंत्रणा धूळ खात पडून असून प्रशासनाच्या या धोरणाबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आधुनिक कचरा कुंड्या बंद असल्याने नागरिकांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला कचरा फेकावा लागत आहे. यामुळे संपूर्ण राणी चन्नम्मा नगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी दररोज याच मार्गावरून ये-जा करत असतानाही या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. स्वच्छतेसाठी आणलेला प्रकल्पच आता अस्वच्छतेचे केंद्र बनला असून, महापालिका प्रशासन यावर काही उपाययोजना करणार की रोगांना आमंत्रण देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या योजनेच्या दुरवस्थेबद्दल बोलताना नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या हेतूने सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Recent Comments