Belagavi

​बेळगावमध्ये झाडांची कत्तल; जिल्हाधिकाऱ्यांना अटक करा, शेतकरी आक्रमक

Share

​बेळगावमधील बडाल अंकलगी येथील कौरी गु़ड्ड परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली आहे. या पर्यावरण ऱ्हासाला प्रशासन जबाबदार असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वनभवनवर धडक दिली.

बेळगाव तालुक्यातील ऐतिहासिक कौरी गु़ड्ड आता विकासाच्या नावाखाली ओसाड होत आहे. एका खासगी सौर ऊर्जा कंपनीच्या हितासाठी सुमारे ५० एकर क्षेत्रातील झाडे मुळासकट तोडण्यात आली असून, यामुळे हजारो मोर आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट झाला आहे. या कत्तलीस महसूल आणि वनविभाग थेट जबाबदार असल्याचा आरोप करत शुक्रवारी शेतकरी संघटना आणि ‘करवे’च्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केले.

बड्या राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊन अधिकारी गप्प बसले असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

​आंदोलनादरम्यान शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी डीएफओ क्रांती एन.ई. यांची चांगलीच कानउघडणी केली. जर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना अटक करण्याची तुमची ताकद नसेल, तर आपण या पदासाठी पात्र नाही असे समजून राजीनामा द्या आणि घरी जा, अशा कडक शब्दांत प्रकाश नायक यांनी सुनावले. मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात अरण्य नष्ट होत असताना विभाग गप्प का, असा सवालही त्यांनी केला. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रकाश नायक यांनी दिला आहे.

Tags: