Belagavi

बेळगावची जीवनवाहिनी मार्कंडेय नदी प्रदूषणाच्या विळख्यात

Share

बेळगाव तालुक्यातील जीवनवाहिनी मानली जाणारी मार्कंडेय नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, हिंडलगा ते मण्णूर-अंबेवाडी दरम्यान असलेल्या पुलावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीचे पाणी विषारी होत असून परिसरात गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंडलगा ते मण्णूर-अंबेवाडी या गावांना जोडणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पुलाला सध्या कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. या पुलावरून ये-जा करणारे नागरिक देवाचे जुने फोटो, मूर्ती, जुने कपडे आणि प्लास्टिक कचरा थेट नदीपात्रात फेकत आहेत. यामुळे नदीची पवित्रता तर नष्ट होत आहेच, पण पाण्याला कमालीची दुर्गंधी सुटली असून जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. धार्मिक साहित्याच्या नावाखाली नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे या मार्गावरून दररोज ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ये-जा करत असूनही, या गंभीर समस्येकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. पावसाळ्यात हेच दूषित पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पसरत असून त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन नदीची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Tags: