Belagavi

सोलर प्लांटच्या नावाखाली अंकलगी डोंगरावर वृक्षसंहार; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघात संताप

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडाल अंकलगी गावात सोलर प्लांट उभारण्याच्या बहाण्याने लाखो वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघात झालेल्या या प्रकारामुळे वन्यजीवांचा अधिवास नष्ट झाला असून स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बडाल अंकलगी येथील महसूल विभागाच्या सुमारे ४० ते ५० एकर वनक्षेत्रातील ऐतिहासिक वृक्षांची जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट काढणी करण्यात आली आहे. या गंभीर वृक्षसंहारासाठी वनविभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उघड होत आहे.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौरीगुड्डा परिसरात क्रांतीवीर संगोळी रायण्णा आणि श्री रेणुका यल्लाम्मा देवी यांचे वास्तव्य होते, अशी भावना श्रद्धाळूंमध्ये आहे. अशा पवित्र मानल्या जाणाऱ्या भूमीवरील चंदन, सागवान यांसारख्या मौल्यवान वृक्षांसह अनेक औषधी वनस्पती मातीमोल झाल्या आहेत. राष्ट्रीय पक्षी मोर आणि इतर वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेले हे जंगल आता स्मशानवत झाले आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी रस्त्याकाठची झाडे तशीच ठेवून आतील भागातील दाट जंगल नष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरटी तस्करी झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

या सर्व प्रकरणाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पाठिंबा असल्याचा थेट आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. ऊर्जा विभागाला सोलर प्लांटसाठी जमीन लीजवर देताना पर्यावरण नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जेसीबीसह संबंधित लोक तेथून पसार झाले. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या या निसर्ग हत्येची वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निसर्गाचा बळी देणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी साहाय्यक वनसंरक्षक यांना आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा वन अधिकारी क्रांती यांनी दिली. बेळगाव येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना डीएफओ क्रांती यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. सरकारी जमिनीवरील झाडे तोडण्यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. या प्रकरणात ज्यांनी कोणी नियमांचे उल्लंघन करून झाडे तोडली आहेत, त्यांच्यावर चौकशी अहवाल प्राप्त होताच कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत चंदनाच्या झाडांचीही कत्तल झाल्याची बाब समोर आली असून, ती जमीन नेमकी वनविभागाची आहे की अन्य विभागाची, याची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही जमीन ‘गायरान’ असल्याचे समजते. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरू असलेली वृक्षतोड थांबवली आहे. या प्रकरणातील दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डीएफओ क्रांती यांनी दिली.

Tags: