Belagavi

बेळगाव शहरात अवजड वाहनांच्या संचारावर बंदी घाला; विविध संघटनांची मागणी

Share

बेळगाव शहरात अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या वाहनांना तातडीने शहर प्रवेशबंदी करावी, या मागणीसाठी सोमवारी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

कर्नाटक राज्य रायत संघ आणि मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. शहरात शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते, ज्यामुळे पादचारी आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे. अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मुक्त संचारावर गदा येत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

शहरात शाळांच्या वेळेत अवजड वाहनांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असून चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे; त्यामुळे प्रशासनाने तातडीने कडक निर्बंध लादावेत, अशी मागणी प्रदीप बुटिया यांनी केली.

यावेळी गंगाधर दोडमणी, ए. ए. नायकवाडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: