Belagavi

अथणीच्या राजकारणावर रमेश जारकीहोळींचे मौन; हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार घेतला मोठा निर्णय

Share

बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी अथणी मतदारसंघाच्या राजकारणाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित निर्णय जाहीर केला आहे. आपल्या हितचिंतकांच्या सल्ल्याचा मान राखून आपण अथणीच्या विषयावर आता मौन पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील केंपवाड गावात पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले की, “मी अथणीच्या राजकारणावर भाष्य केल्यास मला ‘बाहेरचा’ ठरवून चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर सादर केले जात आहे. त्यामुळे माझ्या हितचिंतकांनी मला तिथे न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या शब्दाचा मान राखून मी इथून पुढे अथणीच्या राजकारणावर बोलणार नाही.” जारकीहोळींच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी त्यांनी हिप्परगी बॅरेजच्या गेटच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हालांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “स्थानिक आमदार राजू कागे यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ आमदार असूनही त्यांची उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहेत,” अशी टीका त्यांनी केली. राज्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता सरकारने तातडीने महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून पाणी सोडावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सरकारला सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Tags: